शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण; शिळ्या अन्नामुळे संताप - MahaReport

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण; शिळ्या अन्नामुळे संताप

मुंबई, ९ जुलै २०२५: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिळं आणि खराब अन्न खायला दिल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती आहे. हा सगळा प्रकार मंगळवारी (८ जुलै २०२५) रात्री घडला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं. त्यांनी डाळ आणि भात मागवला होता, पण जेव्हा त्यांनी ते जेवण चाखलं तेव्हा त्यांना डाळ आणि भात शिळे आणि दुर्गंधीयुक्त वाटले. यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी थेट कॅन्टीनमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांशी वाद घातला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गायकवाड हे कॅन्टीनच्या बिलिंग काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लावली ज्यामुळे कर्मचारी खाली पडला.

गायकवाड यांनी यापूर्वीही कॅन्टीनमधील अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या होत्या. “मी यापूर्वी दोन-तीन वेळा अन्नाच्या खराब दर्जाबाबत तक्रार केली होती. यावेळी तर अन्न पूर्णपणे खराब होतं,” असं त्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितलं. ते पुढे म्हणाले, “हा विषय मी चालू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहे.”

गायकवाड यांचं स्पष्टीकरण: “मी योद्धा आहे!”

या घटनेनंतर संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, “मी गेल्या ३० वर्षांपासून आकाशवाणी कॅन्टीनमध्ये जेवत आहे आणि मागील पाच वर्षांपासून तिथे राहत आहे. मी वारंवार अन्नाचा दर्जा सुधारण्याची विनंती केली, पण कोणीही ऐकलं नाही. अंडी १५ दिवस जुनी, मांसाहारी पदार्थ १५-२० दिवस जुने, तर भाज्या २-४ दिवस जुन्या असतात. जवळपास ५,००० ते १०,००० लोक इथे जेवतात आणि सगळ्यांना हीच तक्रार आहे. कधी पाल, कधी उंदीर, तर कधी दोरी अन्नात सापडली आहे.”

गायकवाड यांनी आपल्या कृतीला “शिवसेना स्टाइल” असं संबोधताना म्हटलं, “जर कोणी हिंदी, मराठी किंवा इंग्रजी भाषेत समजत नसेल, तर मला असा मार्ग वापरावा लागतो. मी एक योद्धा आहे आणि माझी प्रतिक्रिया योग्य होती.” त्यांनी पुढे असंही सांगितलं की, त्यांनी कर्मचाऱ्याचा धर्म किंवा त्याच नाव त्याचं नाव पाहिलं नाही, फक्त खराब अन्नावरून त्यांनी कारवाई केली.

विरोधकांचा संताप आणि टीका

या घटनेनंतर विरोधी पक्षांनी संजय गायकवाड यांच्यावर तीव्र टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटलं, “हा आहे शहा सेनेचा आमदार संजय गायकवाड. गेल्या वर्षी त्याने राहुल गांधी यांची जीभ कापण्यासाठी ११ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आता हा गरीब, असहाय्य कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. पण हा भाजपच्या मित्र पक्षाचा आमदार असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल कोणीही आक्रोश करताना दिसणार नाही.”

काँग्रेसनेही या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी गायकवाड यांच्या गेल्या वर्षीच्या राहुल गांधी यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत म्हटलं की, हा त्यांचा आक्रमकतेचा आणखी एक नमुना आहे. शिवसेना उबाठा चे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले, “जर डाळीचा दर्जा खराब असेल, तर याला जबाबदार कोण? तुमचंच सरकार आहे. आदिवासी आणि गरीबांना असंच खराब अन्न दिलं जात आहे. याऐवजी योग्य मार्गाने हा मुद्दा मांडायला हवा होता, कर्मचाऱ्याला मारहाण करणं चुकीचं आहे.”

हे हि वाचा – गुरुपौर्णिमा 2025 : गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? शुभ मुहूर्त, महत्व आणि संपूर्ण माहिती

यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये

संजय गायकवाड हे यापूर्वीही त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्व आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून त्यांची जीभ कापण्यासाठी ११ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. यामुळे त्यांच्याविरुद्ध बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याशिवाय, एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना “जगातील सर्वात अकार्यक्षम विभाग” असं म्हणत टीका केली होती, ज्यामुळे त्यांना पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समज देण्यात आली होती.

विरोधकांची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी गायकवाड यांच्या कृतीला “गुंडागिरी” असं संबोधत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. विरोधी पक्षांनीही सरकारकडे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Leave a Reply