उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे .
गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी मागील आठवड्यात चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचा दावा केला होता तसेच त्यांचा प्रवेश रोखून दाखवण्याचं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले होते. मात्र यानंतर चंद्रहार पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती त्यावेळेस त्यांनी माध्यमांना दिली होती मात्र आज चंद्रहार पाटलांनी आपल्या अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट वर या होणाऱ्या पक्षप्रवेशाबद्दल पोस्ट केली असून त्यांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय नक्की असल्याची माहिती आहे.
चंद्रहार पाटील यांनी केलेली फेसबुक पोस्ट –
राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. - पै. चंद्रहार पाटील

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणूक वेळी आपल्या हक्काची कोल्हापूर लोकसभेची जागा सोडून त्या बदल्यात सांगली लोकसभेची जागा मागून घेतली होती. त्यावेळेस विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि काँग्रेस नेतृत्वाबद्दल त्यांनी जाहीर विरोधी भूमिका घेतली होती. मात्र या निवडणुकीत अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला होता.
कोण आहे चंद्रहार पाटील ?
चंद्रहार पाटील हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कुस्तीपटू आणि राजकारणी आहेत. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे, ज्यामुळे त्यांना “डबल महाराष्ट्र केसरी” म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला असून, त्यांनी कुस्ती क्षेत्रात मोठी ख्याती मिळवली आहे.
राजकीय कारकीर्द:
- 2024 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश: चंद्रहार पाटील यांनी मार्च 2024 मध्ये मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.
- सांगली लोकसभा निवडणूक: त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA) कडून सांगली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना केवळ 60,860 मते मिळाली आणि त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
- विवाद आणि पक्षांतर: सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात मतभेद झाले. चंद्रहार पाटील यांनी काँग्रेसवर शेतकऱ्याच्या मुलाला खासदार होण्यापासून रोखल्याचा आरोप केला होता. जून 2025 मध्ये अशी माहिती समोर आली की ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या राजकीय निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
कुस्ती क्षेत्रातील योगदान:
- चंद्रहार पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात अनेक स्पर्धा गाजवल्या असून, त्यांना महाराष्ट्र केसरी 2017 मधील यशामुळे विशेष ओळख मिळाली.
- 2025 मध्ये त्यांनी कुस्ती क्षेत्रातील राजकारण थांबवण्यासाठी आणि “एक राज्य-एक खेळ-एक संघटना” या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
- त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा वर्षातून फक्त एकदाच व्हावी, अशी मागणी केली आहे, कारण 2025 मध्ये चार वेळा ही स्पर्धा आयोजित होण्याची शक्यता आहे.