टाटा हॅरियर ईव्ही(Tata Harrier EV) भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स

टाटा मोटर्सने भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. ३ जून २०२५ रोजी टाटा हॅरियर ईव्ही या बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक एसयूव्हीचे मुंबईत लॉन्च झाले. या गाडीची सुरुवातीची किंमत (बेस मॉडेल) २१.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मालिकेतील ही सहावी गाडी असून ती महिंद्रा एक्सईव्ही ९ई (Mahindra XEV 9e) आणि बीवायडी अट्टो ३ (BYD Atto 3) यांच्याशी थेट स्पर्धा करेल. या गाडीच्या बुकिंग्ज २ जुलै २०२५ पासून सुरू होणार असून त्यानंतर लवकरच डिलिव्हरी सुरू होणार आहे. या लेखात आपण टाटा हॅरियर ईव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल, डिझाइनबद्दल, परफॉर्मन्सबद्दल आणि त्याच्या स्पर्धकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आकर्षक आणि आधुनिक डिझाइन:

टाटा हॅरियर ईव्ही ही त्यांच्या डिझेल आवृत्तीवर आधारित आहे. परंतु यात काही खास बदल करण्यात आले आहेत ज्यामुळे ती इलेक्ट्रिक वाहन म्हणून वेगळी ठरते. या गाडीच्या बाह्य डिझाइनमध्ये बंद ग्रिल, नवीन बंपर डिझाइन आणि १९ इंचांचे एरो-ऑप्टिमाइझ्ड अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे. यामुळे गाडीला आकर्षक आणि प्रीमियम लूक मिळाला आहे. टाटाच्या नवीन डिझाइन लँग्वेजमधून प्रेरणा घेत हॅरियर ईव्हीला मॉडर्न लायटिंग सिग्नेचर मिळाले आहे ज्यात कनेक्टेड एलईडी हेडलॅम्प्स आणि टेल लॅम्प्स यांचा समावेश आहे.

गाडी चार रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: नैनिताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्युअर ग्रे आणि प्रिस्टाईन व्हाईट. याशिवाय, लवकरच एक स्टेल्थ एडिशन देखील लॉन्च होणार आहे, ज्यामध्ये ऑल-ब्लॅक थीम आणि मॅट ब्लॅक फिनिश असेल. या गाडीची रोड प्रेझन्स ही त्याच्या डिझेल आवृत्तीप्रमाणेच प्रभावी आहे ज्यामुळे ती रस्त्यावर लक्ष वेधून घेते.

प्रीमियम आणि टेक्नॉलॉजीने परिपूर्ण इंटिरिअर:

हॅरियर ईव्हीच्या इंटिरिअर डिझाइनमध्ये टाटाने प्रीमियम अनुभव देण्यावर भर दिला आहे. गाडीच्या आतमध्ये १४.५३ इंचांचा क्यूएलईडी इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, जो सॅमसंगने बनवला आहे. हा स्क्रीन वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट करतो, तसेच स्ट्रीमिंग ऍप्स आणि गेम्ससाठी देखील वापरला जाऊ शकतो. याशिवाय १०.२ इंचांचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जो फुल-स्क्रीन मॅप्स सपोर्टसह येतो.

गाडीच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्रायव्हर सीटसाठी मेमरी फंक्शन, रिअर एसी व्हेंट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, एम्बिएन्ट लायटिंग, इलेक्ट्रिक बॉस मोड, रिअर सन शेड्स, डिजिटल की आणि जेबीएलचा प्रीमियम ऑडिओ सिस्टम यांचा समावेश आहे. स्मार्ट आयआरव्हीएम (इंटेलिजंट रिअर व्ह्यू मिरर) हे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, जे ड्रायव्हरला रस्त्यावरील परिस्थिती स्पष्टपणे पाहण्यास मदत करते.

परफॉर्मन्स आणि बॅटरी

टाटा हॅरियर ईव्ही दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे: ६५ किलोवॅट-तास आणि ७५ किलोवॅट-तास. या बॅटरी पॅक लिथियम-आयर्न फॉस्फेट तंत्रज्ञानावर आधारित आहेत ज्यामुळे त्यांची टिकाऊपणा आणि सुरक्षितता वाढते. ७५ किलोवॅट-तास बॅटरीसह रिअर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी) व्हेरियंट एका चार्जवर ६२७ किमी (एमआयडीसी सायकल) रेंज देते, तर टाटाच्या सी७५ टेस्टनुसार रिअल-वर्ल्ड रेंज ४८०-५०५ किमी आहे.

या गाडीमध्ये दोन मोटर पर्याय आहेत: रिअर-व्हील ड्राइव्ह (२३८ पीएस) आणि ड्युअल-मोटर क्वाड व्हील ड्राइव्ह (क्यूडब्ल्यूडी), ज्यामध्ये फ्रंट मोटर १५८ पीएस आणि रिअर मोटर २३८ पीएस पॉवर देते. एकत्रितपणे ही गाडी ३९० बीएचपी आणि ५०४ एनएम टॉर्क जनरेट करते ज्यामुळे ती ० ते १०० किमी/तास वेग ६.३ सेकंदात गाठते. बूस्ट मोडच्या मदतीने ड्रायव्हरला तात्काळ टॉर्क मिळतो जो ओव्हरटेकिंगसाठी उपयुक्त आहे.

हे हि वाचा – NEET UG 2025 उत्तर पत्रिका जाहीर: इथून करा डाउनलोड

चार्जिंगच्या बाबतीत हॅरियर ईव्ही ७.२ किलोवॅट एसी चार्जरसह १०.७ तासांत १००% चार्ज होऊ शकते, तर १२० किलोवॅट डीसी फास्ट चार्जरने २० ते ८०% चार्जिंग केवळ २५ मिनिटांत होते. टाटाच्या मेगा चार्जर्ससह १५ मिनिटांत २५० किमी रेंज मिळू शकते. विशेष म्हणजे या गाडीच्या बॅटरीवर लाइफटाइम वॉरंटी देण्यात आली आहे, जी भारतीय ग्राहकांसाठी मोठी आश्वासक बाब आहे.

सेफ्टी

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, टाटा हॅरियर ईव्ही मध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ३६०-डिग्री कॅमेरा आणि स्वयंचलित ड्रायव्हरलेस पार्किंग यासारखी वैशिष्ट्ये आहेत. ट्रान्सपरंट मोड मुळे गाडीच्या खालच्या बाजूचे व्हिडिओ फीड मिळते जे ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी उपयुक्त आहे.

स्पर्धा आणि बाजारपेठेतील स्थान

टाटा हॅरियर ईव्ही ही मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्रा एक्सईव्ही ९ई, बीवायडी अट्टो ३, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि आगामी मारुती सुझुकी ई-व्हिटारा यांच्याशी स्पर्धा करेल. २१.४९ लाख रुपयांपासून सुरू होणारी किंमत आणि ६२७ किमी रेंज यामुळे ही गाडी या सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरते. टाटा मोटर्सने आपल्या ओपन कॉलॅबोरेशन २.० उपक्रमाद्वारे २०२७ पर्यंत देशभरात ४,००,००० पब्लिक चार्जिंग पॉइंट्स उभारण्याची योजना आखली आहे, एकंदरीत टाटा हॅरियर ईव्ही च्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी हि आनंदाची बातमी आहे.

Leave a Reply