बीड जिल्ह्यातील माजलगावचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आर.टी. देशमुख (R.T. Deshmukh ) यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला आहे. या अपघातात आमदार आर.टी. देशमुख यांचे दुःखद निधन झाले असून या अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती मिळत आहे.
पावसामुळे झाली गाडी स्लिप, दोन जण गंभीर जखमी
राज्यातील अपघातांच्या घटना वाढ झाली असून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने अपघाताचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन झाले आहे, अपघातानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करुन आमदार आर ती देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मंत्री पंकजा मुंडेंचे सर्व कार्यक्रम रद्द
दरम्यान राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती मिळाली. आमदार आर.टी. देशमुख यांचे मुंडे कुटुंबियांसोबत अत्यंत चांगले संबंध होते. पघाताची माहिती मिळाल्यांनतर पंकजा मुंडे यांनी तातडीने आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. किनीकर यांच्याशीही संवाद साधून माहिती घेतली.