वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर.

वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले आणि मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे (Vasant More) यांना वंचित बहुजन आघाडीने पुणे लोकसभेसाठी आज उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्यात लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार असून भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मोरे या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे. पुणे लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला असून काँग्रेसने या ठिकाणावरून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत.

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची वसंत मोरे यांनी भेट घेतली होती. पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला असून आपण या बाबतीत वरिष्ठ पातळीवर चर्चा करू असा आश्वासन शरद पवार यांनी वसंत मोरे यांना दिले होते. मात्र या प्रयत्नांना यश आल्याचे दिसले नाही.

वसंत मोरे यांनी मागच्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी कडून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात होती. आज वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबामुळे सुप्रिया सुळे यांना लोकसभेच्या रणांगणात फायदा होण्याची शक्यता आहे. वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पुण्यातील लढत आता तिरंगी होणार असल्याचे नक्की झाले आहे.

हे हि वाचा – गुढीपाडवा का साजरा करतात ? गुढीपाडवा २०२४; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

पुणे शहरात वसंत मोरे यांना मानणारा बराच मोठा वर्ग आहे. मोरे हे आपल्या कामाच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. जनता दरबारासारखे अनेक उपक्रम ते घेत असतात. सोशल मीडियावर हे वसंत मोरे यांचे लाखो फॉलॉवर्स आहेत. वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे ते पुणे लोकसभा मतदारसंघात तगडी फाईट देऊ शकतात. वसंत मोरे यांच्या उमेदवारीमुळे मत विभागणीचा फटका महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता आहे. मुस्लिम आणि दलित मते हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना मिळाल्यास त्याचा फटका काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात येणारे विधानसभा मतदार संघ –

पुणे लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश पुणे लोकसभा मतदारसंघात होतो.

वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार असून ते सध्या अजित पवार गटात आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील आमदार आहेत. पर्वती विधानसभेत भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार असून पुणे छावणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे हे आमदार आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. म्हणजेच सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असून एका मतदार संघात राष्ट्रवादी आणि एका मतदार संघात काँग्रेस असं पक्षीय बलाबल आहे.

पुण्याची पसंत, मोरे वसंत

गेल्या काही महिन्यांपासून मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. ‘पुण्याची पसंत, मोरे वसंत’ ही टॅगलाईन घेऊन वसंत मोरे यांनी आपल्या पद्धतीने प्रचाराला ही सुरुवात केली होती. वसंत मोरे हे पुणे महानगरपालिकेत सलग तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत. नगरसेवक म्हणून सलग तीन वेळा निवडून जाणार येथे मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार होते. वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरप्रमुख पद भूषवले आहे. त्याचबरोबर वसंत मोरे यांनी पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता पद ही भूषवले आहे. पुणे महानगरपालिकेत मनसेचे गटनेता म्हणूनही वसंत मोरे यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे वसंत मोरे हे भाजपचे उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना चांगली लढत देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *