कोण होणार शिर्डी लोकसभेचा खासदार? उद्धव ठाकरे बालेकिल्ला राखणार कि एकनाथ शिंदे ठाकरेंना धक्का देणार?

कोण होणार शिर्डी लोकसभेचा खासदार?
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच जाहीर झाली असून आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपने आपली 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे तसेच काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्रातील आपल्या सात उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी येण्याची शक्यता आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये सध्या शिर्डी लोकसभेच्या (Shirdi Loksabha Constituency) जागेवरून घमासान सुरू आहे. आजच्या लेखात जाणून घेऊया शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आणि या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती.

पूर्वीचा कोपरगाव म्हणजेच आताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ होय. 2009 या वर्षी मतदार संघाची पुनर्रचना होऊन शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. 2009 पूर्वी हा मतदार संघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. माजी मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil)  यांचा या मतदार संघावर तगडा प्रभाव होता. मात्र 2009 वर्षी मतदारसंघ राखीव झाल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणित एकदमच बदलून गेले.

2009 यावर्षी या मतदारसंघातून शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले(Ramdas Athawale) यांचा पराभव करून खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच रिपब्लिकन पार्टी या पक्षांची युती होती. काँग्रेसने हा मतदार संघ सुरक्षित असल्याकारणाने रामदास आठवले यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र आठवले यांच्या बाबतीत बाहेरचा उमेदवार आणि इतर नकारात्मक प्रचार केला गेल्यामुळे रामदास आठवले यांचा मोठ्या मताधिक्क्याने शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला. भाऊसाहेब वाकचौरे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मातब्बर असलेले रामदास आठवले यांचा पराभव केला. या पाच वर्षांमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघात आपल्या कामाची झलक दाखवून दिली. दांडगा जनसंपर्क त्यांनी तयार केला. जवळपास प्रत्येक गावात मंदिरांसाठी देणगी तसेच सभामंडप इत्यादी भरीव कामे त्यांनी पाच वर्षात केली.

हे हि वाचा – होळी का साजरी करतात? जाणून घ्या होळी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व

2014 या वर्षी भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी नक्की असताना त्यांनी एनवेळी शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. एन मोदी लाटेत वाकचौरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आपल्याला निवडून आणण्यात विखे आणि थोरात यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे वाकचौरे यांचे म्हणणे होते त्यामुळे त्यांनी कुठलाही विचार न करता काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली. वाकचौरे यांनी अचानक पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने त्यावेळी शिवसेनेला उमेदवाराची वनवा होती. याच संधीचा फायदा घेऊन कर्जत जामखेड चे माजी आमदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभेचे तिकीट मिळवले. मतदारांना नवीन असलेले सदाशिव लोखंडे केवळ पंधरा दिवसांचा प्रचार करून थेट लोकसभेत पोहोचले. मोदी लाटेचा सदाशिव लोखंडे यांना मोठा फायदा झाला आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मात्र निवडून आल्यानंतर मतदार संघातील कमी जनसंपर्क सदाशिव लोखंडे यांना मारक ठरला. 2019 यावर्षी सदाशिव लोखंडे यांना तिकीट देताना स्वपक्षातूनच विरोध झाला. पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सदाशिव लोखंडे यांना तिकीट देऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती मात्र उद्धव ठाकरे यांनी सदाशिव लोखंडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा 2019 यावर्षी लोकसभेचे तिकीट दिले. सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kambale) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत दुसऱ्या वेळेस दिल्ली गाठली.

शिवसेनेत झालेल्या फुटी नंतर शिर्डीतील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. उद्धव ठाकरे यांना शिर्डी लोकसभेत यंदा उमेदवाराची कमतरता जाणवत असतानाच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचे तिकीट जवळपास निश्चित असून त्यांचा सामना यावेळी पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. महायुतीत शिर्डी लोकसभेची जागा कोणाकडे जाणार याचा अजूनही निर्णय झाला नाही मात्र सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे उमेदवारी देतील अशी शक्यता आहे. मात्र सदाशिव लोखंडे यांचा मतदार संघात जनसंपर्क कमी असल्या कारणाने भाजपने सदाशिव लोखंडे यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच शिर्डीच्या जागेवर भाजपनेही दावा ठोकला आहे. श्रीरामपूर चे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांनाही उमेदवारी भेटू शकते अशी शक्यता आहे असे झाल्यास शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे असा सामना होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीने आम्हाला शिर्डीची जागा सोडावी अशी मागणी त्यांनी वारंवार केली आहे. त्यामुळे एनवेळी भाजप आणि एकनाथ शिंदे शिर्डीची जागा रामदास आठवले यांनाही सोडू शकतात. असे झाल्यास शिर्डी मतदारसंघात 2019 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

शिर्डी लोकसभेत येणारे मतदारसंघ

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, राहता या विधानसभा मतदारसंघाचा समावेश शिर्डी लोकसभेत होतो. संगमनेर मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे एक हाती वर्चस्व या मतदारसंघात आहे. राहता मतदार संघ हा विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vilkhe Patil) यांचा बालेकिल्ला समजला जातो. अकोले मतदार संघात सध्या किरण लहामटे (Kiran Lahamate) हे आमदार असून ते सध्या अजित पवार गटात आहेत. नेवासा मतदार संघात माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) हे आमदार असून ते सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. श्रीरामपूर मध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे लहू कानडे (Lahu Knade) हे आमदार आहेत. कोपरगाव मतदार संघात आशुतोष काळे (Ashutosh Kale) हे आमदार असून ते सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. एकंदरीत शिर्डी मतदार संघात अजित पवार गटाचे दोन आमदार असून काँग्रेस पक्षाचे ही दोन आमदार आहेत. भाजपचा एक आमदार असून शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार असं पक्षीय बलाबल सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वैशिष्ट्ये

शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे देशातील दोन्ही महत्त्वाची देवस्थाने शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत असल्याने या मतदार संघाला एक धार्मिक महत्त्व आहे. मात्र तरीही गेल्या काही वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा म्हणावा असा विकास झालेला दिसत नाही. तरुणांना रोजगाराचा प्रश्न, अनेक मतदार संघात दुरावस्थेत असलेल्या एमआयडीसी, खराब रस्ते, शेतीमालाला हमीभाव नसणे, दुधाचे कमी झालेले दर ह्या या मतदारसंघातील मुख्य समस्या आहेत. एकंदरीतच सध्याचे राजकीय वातावरण बघता शिर्डी मतदार संघातून मतदार कोणाला खासदार म्हणून निवडून देतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *