उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली लोकसभेच्या १७ उमेदवारांची पहिली यादी

शिवसेना उमेदवारांची यादी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (ShivSena Uddhav Balasaheb Thackeray) लोकसभेची आपली 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अनिल देसाई (Anil Desai) यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आज शिवसेनेने 17 (ShivSena UBT Loksabha Candidate List) उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या अद्याप चार ते पाच जागांची यादी जाहीर झाली नसून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर ही यादी जाहीर होईल अशी माहिती मिळत आहे.

ठाकरेंच्या 17 उमेदवारांची यादी

 1. बुलढाणा –  नरेंद्र खेडेकर
 2. यवतमाळ -वाशिम  – संजय देशमुख
 3. मावळ – संजोग वाघेरे-पाटील
 4. सांगली -चंद्रहार पाटील
 5. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
 6. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
 7. धाराशिव – ओमराजे निंबाळकर
 8. शिर्डी- भाऊसाहेबर वाकचौरे
 9. नाशिक – राजाभाऊ वाजे
 10. रायगड – अनंत गीते
 11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
 12. ठाणे – राजन विचारे
 13. मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
 14. मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
 15. मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
 16. परभणी – संजय जाधव
 17. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील रिंगणात

सांगली येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा ठाकरे गट लढणार असे स्पष्ट करत सांगलीतून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीला काँग्रेसने कडाडून विरोध केला होता मात्र आजच्या या यादीमध्ये सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आज काँग्रेस पक्षातील नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

अमोल कीर्तिकर(Amol Kirtikar) यांना ईडीची नोटीस

एकीकडे अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली असताना आजच ईडीने अमोल कीर्तीकर यांना समान पाठवले असून आजच्या आज इडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे बजावले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अमोल कीर्तिकर आणि ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने अमोल कीर्तीकर यांना नोटीस पाठवली आहे.

काँग्रेसचे संजय निरुपम नाराज

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असून अमोल कीर्तिकर यांचा प्रचार करणार नसल्याची घोषणा केली आहे. तसेच माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असून येणाऱ्या आठ दिवसात मी निर्णय घेणार असल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात संजय निरुपम हे भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यामुळे अंबादास दानवे नाराज?

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे हे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. अंबादास दानवे हे छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

शिर्डीतून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2009 च्या लोकसभेच्या निवडणुकी वेळी शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवले यांचा पराभव करत खासदारकी मिळवली होती. काही महिन्यांपूर्वीच भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुन्हा एकदा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला होता. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर विश्वास दाखवत शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. शिर्डीतून महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नसला तरी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे थेट लढत होण्याची शक्यता आहे.

हे हि वाचा – कोण होणार शिर्डी लोकसभेचा खासदार? उद्धव ठाकरे बालेकिल्ला राखणार कि एकनाथ शिंदे ठाकरेंना धक्का देणार?

ईशान्य मुंबईत मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील

2019 यावर्षी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. संजय दिना पाटील हे माजी खासदार असून उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून या ठिकाणी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केले आहे त्यामुळे मिहीर कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे.

नाशिक मधून निष्ठावान राजाभाऊ राजे लोकसभेच्या रिंगणात
नाशिक लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून विजय आप्पा करंजकर यांचे नाव सर्वात पुढे होते मात्र ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केले आहे. राजाभाऊ वाजे हे एक सर्वसामान्य शिवसैनिक असून पक्ष फुटी नंतरही ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले होते. एकंदरीतच राजाभाऊ वाजे यांना निष्ठेचे फळ मिळाले असून नाशिक मधून ते उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे आहेत. महायुतीची नाशिकची जागा अजूनही जाहीर झाली नसून या जागेवर राष्ट्रवादीने दावा ठोकला असून छगन भुजबळ नाशिक लोकसभेची निवडणूक लढू शकतात अशी शक्यता आहे. असे झाल्यास छगन भुजबळ विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *